DCS MH EPeek pahani 2026 : महाराष्ट्र शासनाच्या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील शेतकऱ्यांना ई-पीक पाहणीबाबतची दीर्घकाळची अडचण आता दूर होणार आहे. खरीप हंगाम २०२६ पासून संपूर्ण राज्यात १००% ई-पीक पाहणी (Digital Crop Survey – DCS MH) ही प्रक्रिया पीक पाहणी सहाय्यकांच्या माध्यमातून केली जाणार आहे. यामुळे शेतकऱ्यांना स्वतः मोबाइल अॅप वापरून नोंद करण्याची गरज राहणार नाही.
का झाला हा बदल?
केंद्र शासनाने प्रत्येक राज्याला प्रत्येक हंगामात (खरीप, रब्बी आणि उन्हाळी) १००% पीक नोंदणी अनिवार्य केली आहे. यासाठी निधीही उपलब्ध करून देण्यात येतो. पूर्वी अनेक शेतकऱ्यांकडे अँड्रॉइड फोन नसणे, नेटवर्क समस्या, अॅपबद्दल अपुरी माहिती किंवा चुकीच्या नोंदी यामुळे पाहणी पूर्ण होत नव्हती. त्यामुळे आकडेवारीही अचूक येत नव्हती.
या सर्व समस्यांवर मात करण्यासाठी राज्य शासनाने आता सहाय्यक स्तरावरून संपूर्ण ई-पीक पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. गावपातळीवर तहसीलदारांमार्फत सहाय्यकांची नियुक्ती केली जाईल. विशेषतः महिला बचत गटातील इच्छुक सदस्य या कामासाठी प्राधान्याने निवडले जातील.

सहाय्यकांना मिळणारे मानधन
- साध्या पिकासाठी प्रति प्लॉट ₹१०
- मिश्र पिकासाठी प्रति प्लॉट ₹१२
ही रक्कम सहाय्यकांना नियमितपणे मिळेल.

नवीन प्रक्रिया आणि नियम
- पाहणी DCS MH (Digital Crop Survey) अॅपद्वारे होईल.
- पूर्वीची अंतर मर्यादा आता २० मीटर आहे. सहाय्यकाला संबंधित शेतापासून २० मीटरच्या आत असणे आवश्यक आहे.
- ऑफलाइन मोडमध्ये डेटा कॅप्चर करता येईल आणि नंतर ऑनलाइन अपलोड करता येईल.
- कायम पड (परमनंट फॉलो), चालू पड, फळबागा, एकल पीक, इंटरक्रॉप किंवा सीझनल पीक या सर्व नोंदी अचूकपणे करता येतील.
- फोटो आणि GPS लोकेशनसह नोंद आवश्यक आहे.
- नोंद AgriStack प्रणालीशी जोडली असल्याने शेतकऱ्याला SMS द्वारे माहिती मिळेल.
- प्रत्येक नोंद ग्राम महसूल अधिकाऱ्यांकडून पडताळणी केल्यानंतरच गाव नमुना क्रमांक १२ वर दाखल होईल. चुकीची नोंद आढळल्यास ती रद्द करून पुन्हा पाहणी केली जाईल. शेतकऱ्याला चालू हंगाम संपण्यापूर्वी दुरुस्तीसाठी अर्ज करता येईल.
शेतकऱ्यांसाठी फायदे
आता शेतकऱ्यांना मोबाइल अॅप डाउनलोड करणे, लॉगिन करणे, प्लॉट निवडणे किंवा फोटो अपलोड करण्याची धावपळ करावी लागणार नाही. सहाय्यक थेट शेतात जाऊन नोंद करेल. यामुळे वेळ, श्रम आणि चुका कमी होतील. पीक कर्ज, पीक विमा आणि इतर शासकीय योजनांसाठी ही अचूक माहिती उपयुक्त ठरेल.

प्रशिक्षण अॅप उपलब्ध
सहाय्यकांसाठी DCS Training App आणण्यात आले आहे. या अॅपमध्ये लॉगिन, प्लॉट निवड, कायम पड/पडीक जमीन नोंद, पिकांची नोंद (Single / Intercrop / Seasonal), फोटो काढणे आणि डेटा सबमिट करण्याची संपूर्ण प्रक्रिया सराव करता येते. अॅप वास्तविक DCS MH अॅपसारखेच आहे, फक्त ते प्रशिक्षण हेतूने आहे.

DCS MH Crop Survey पोर्टल:
https://mhdcs.agristack.gov.in/crop-survey-mh/#/

शेतकऱ्यांनी काय करावे?
सहाय्यक शेतात आल्यावर सहकार्य करा. नोंद झाल्यानंतर SMS तपासा. काही त्रुटी आढळल्यास लवकरात लवकर मंडळ अधिकारी किंवा संबंधित कार्यालयाकडे संपर्क साधा.
खरीप हंगाम २०२६ पासून ही नवीन व्यवस्था लागू होत असल्याने शेतकऱ्यांची ई-पीक पाहणीबाबतची कटकट कायमची मिटणार आहे. अचूक आणि संपूर्ण पीक नोंदणीमुळे शासकीय योजनांचा लाभ अधिक प्रभावीपणे मिळेल.

अधिक अद्ययावत माहितीसाठी अधिकृत शासन निर्णय आणि DCS अॅप तपासा. शेतकरी बांधवांना ही माहिती शेअर करा जेणेकरून सर्वांना फायदा होईल.





