maharashtra rain update : ऑगस्ट महिन्यात पावसाने दिलेली विश्रांती शेतकऱ्यांना आणि नागरिकांना चिंतात टाकत होती. आता भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी आहे. पुढील काही दिवसांत राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
ओडिशा भागातून पश्चिमेकडे सरकत असलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे आणि दक्षिण गुजरात ते उत्तर मध्य महाराष्ट्र यादरम्यान तयार झालेल्या वाऱ्याच्या द्रोणीय रेषेमुळे हवामानात बदल होत आहेत. या प्रणालीमुळे २ सप्टेंबरच्या संध्याकाळपासून उत्तर मध्य महाराष्ट्रात पाऊस वाढू शकतो. त्यानंतर ३ ते ५ सप्टेंबरदरम्यान राज्याच्या मोठ्या भागात चांगला आणि काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
कोणत्या भागांत जास्त पाऊस?
हवामान विभागाने गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. विदर्भातील इतर जिल्हे तसेच पुण्याच्या घाट परिसरातही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्राच्या घाट भागात आणि दक्षिण कोकणात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मध्य प्रदेशला लागून असलेल्या भागात या हवामान प्रणालीचा सर्वाधिक प्रभाव दिसून येईल.
शेती आणि पाणीसाठ्यासाठी महत्त्वाचा पाऊस
३ ते ५ सप्टेंबरदरम्यान पडणारा हा पाऊस शेतीसाठी आणि जमिनीतील तसेच धरणांमधील पाणीसाठा वाढवण्यासाठी खूप महत्त्वाचा ठरेल. ऑगस्टअखेरपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशभरात सरासरीच्या तुलनेत सुमारे १४ टक्के तर महाराष्ट्रात सुमारे १२ टक्के पावसाची तूट नोंदवली गेली होती. त्यामुळे हा पाऊस शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरू शकतो.
नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या पुढील सूचनांवर लक्ष ठेवावे. पावसाळ्यात सुरक्षिततेसाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी.





