Krushi Mitra Bharti : महाराष्ट्र शासनाने आत्मा योजनेअंतर्गत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी शेतकरी मित्र निवडीच्या सुधारित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या सूचनेनुसार अनुभवी आणि सक्रिय शेतकऱ्यांना मानधन तत्त्वावर निवडले जाणार आहे. शेतकरी मित्र हे कृषि विभाग आणि गाव पातळीवरील शेतकऱ्यांमधील महत्त्वाचा दुवा म्हणून काम करतील.
शेतकरी मित्र कोण असावेत?
शेतकरी मित्र हा कृषि क्षेत्रात आवड असणारा, नवीन तंत्रज्ञान स्वीकारणारा आणि इतर शेतकऱ्यांना सोबत घेऊन काम करणारा असावा. त्याने विस्तार कामासाठी स्वयंप्रेरणेने आणि सेवाभावी वृत्तीने काम करावे. कृषि विभागाच्या मोबाईल अॅप आणि MIS पोर्टलवर माहिती भरण्याची तयारी असावी. गावातील शेतकऱ्यांशी उत्तम संवाद साधण्याचे आणि संघटन करण्याचे कौशल्य असणे गरजेचे आहे. तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक (BTM) यांच्याशी सतत संपर्क ठेवणे आणि दिलेली कामे पूर्ण करणे आवश्यक राहील.

किमान पात्रता निकष
- वय किमान २५ आणि कमाल ६० वर्षे असावे.
- संबंधित सहायक कृषि अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातील गावातील रहिवासी आणि शेतकरी असावा.
- कोणताही गुन्हा दाखल झालेला नसावा.
- किमान १२वी पास असणे आवश्यक.
- समाज माध्यम हाताळण्याचे किमान कौशल्य असावे.
- दिवसातून किमान २ तास कृषि विभागाचे काम करणे आवश्यक.
- मिळणारे मानधन हे उपजीविकेचे साधन म्हणून न पाहता, शेती हाच मुख्य व्यवसाय असावा.
शेतकरी मित्राच्या मुख्य जबाबदाऱ्या
शेतकरी मित्रांनी स्वयंप्रेरणेने काम करणे अपेक्षित आहे. प्रमुख कामे खालीलप्रमाणे आहेत:
- गावामध्ये महिला/पुरुष शेतकरी गट (FIG), पीकनिहाय शेतकरी गट (CIG) आणि महिला अन्न सुरक्षा गट (FSG) तयार करणे व त्यांची क्षमता बांधणी, मूल्यमापन आणि सर्वेक्षणात मदत करणे.
- नैसर्गिक शेती आणि आत्मा योजनेअंतर्गत शेतीशाळेसाठी लाभार्थी निवड करणे, शेतीशाळा राबविण्यात मदत करणे आणि सर्व वर्गांना उपस्थित राहणे.
- ग्रामसभेत सहभागी होऊन कृषि व संलग्न विभागांच्या योजनांची माहिती देणे.
- नैसर्गिक शेती योजनेचा प्रत्येक गावात प्रचार-प्रसिद्धी करणे आणि कृषि तंत्रज्ञानाचा प्रसार करणे.
- तालुका कृषि अधिकारी यांच्या बैठकीस उपस्थित राहणे.
- प्रात्यक्षिकाच्या तुलनात्मक नोंदी ठेवणे.
- गावात आयोजित शेतकरी प्रशिक्षणासाठी पूर्वतयारी आणि यशस्वी आयोजनात मदत करणे.
- विविध योजना, मोहिमा, डिजिटल शेतीशाळा याबाबत प्रचार-प्रसिद्धी करणे.
- तालुकास्तरीय शेतकरी सल्लागार समितीने नेमून दिलेले कामकाज पार पाडणे.
- कार्यक्षेत्रात शेतकरी सुविधा केंद्र स्थापन करणे.
निवड प्रक्रिया कशी होईल?
तालुक्यात निवड होणाऱ्या एकूण शेतकरी मित्रांपैकी ३० टक्के महिलांची निवड अनिवार्य आहे. त्यासाठी तालुका कृषि अधिकारी यांनी ३० टक्के गावे लॉटरी पद्धतीने महिलांसाठी राखीव करावीत.
सहायक कृषि अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात ग्रामपंचायत सूचना फलकावर आणि इतर माध्यमांतून प्रसिद्धी करावी. प्रसिद्धीत स्पष्ट नमूद करावे की ही सेवा मानधन तत्त्वावरील आहे आणि कृषि विभागात कायम स्वरूपात नोकरीचा दावा करता येणार नाही.

इच्छुक उमेदवारांनी अर्ज ग्राम कृषि विकास समितीकडे सादर करावेत. ज्या गावात ही समिती स्थापन झाली नाही, तिथे तात्काळ स्थापन करून प्रक्रिया सुरू करावी.

निवड करताना उपलब्ध अर्जांमधून सर्वात जास्त शिक्षण असलेल्या उमेदवाराची निवड करावी. प्राधान्यक्रम असा आहे:
- पदव्युत्तर पदवीधारक
- पदवीधारक
- पदविकाधारक
- बारावी उत्तीर्ण
समान शैक्षणिक अर्हता असल्यास जास्त गुण मिळालेल्या उमेदवाराची निवड करावी. ग्राम कृषि विकास समितीच्या ठरावाने निवड अंतिमरित्या करावी आणि संपूर्ण माहिती पुढील ग्रामसभेत ठेवावी. प्रक्रिया पारदर्शक राहावी यासाठी अर्ज, गुणवत्ता यादी आणि निकष सूचना फलकावर प्रसिद्ध करावेत.

प्रत्येक मंजूर सहायक कृषि अधिकारी पदासाठी एक शेतकरी मित्र निवडला जाईल. निवड दोन वर्षांसाठी असेल आणि आत्मा योजनेच्या निधीच्या अधीन राहील. एकदा निवड झाल्यानंतर पुन्हा निवड होणार नाही. निवड अंतिमरित्या झाल्यानंतर रुजू होण्यापूर्वी बंधपत्र (प्रपत्र ५) लिहून घ्यावे.

क्षमता विकास आणि मूल्यमापन
निवडीनंतर तालुका किंवा जिल्हा स्तरावर प्रशिक्षण आयोजित करावे. आवश्यकता असल्यास कृषि विज्ञान केंद्र, कृषि विद्यापीठ किंवा संशोधन केंद्रात प्रक्षेत्र भेटी आणि सहलींचे आयोजन करावे. ओळखपत्र तालुका कृषि अधिकारी कार्यालयामार्फत द्यावे आणि कालावधी संपल्यानंतर ते जमा करावे.

पहिले वर्ष पूर्ण झाल्यानंतर शेतकरी मित्राने वार्षिक स्वयंमूल्यमापन अहवाल (प्रपत्र २) सादर करावा. तांत्रिक बाबींचे मूल्यमापन १०० गुणांचे आणि नाविन्यपूर्ण/उल्लेखनीय कामांचे २५ गुणांचे असेल. एकूण ७५ किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळाल्यास सेवा पुढील एक वर्षासाठी सुरू राहील. अन्यथा नवीन निवड करावी.

मानधन आणि खर्च
प्रतिमहा ₹१,५०० प्रमाणे वार्षिक ₹१८,००० मानधन देय राहील. अतिरिक्त कोणतेही भत्ते, प्रवास खर्च किंवा इतर निधी मिळणार नाही. प्रत्येक तीन महिन्यांनी कामाचा अहवाल (प्रपत्र १) सादर करावा. मानधन SNA स्पर्श प्रणालीद्वारे तीन महिन्यांचे एकत्रित अदा करावे. रोखीने अदा करू नये.
जिल्हानिहाय लक्षांक
राज्यात एकूण ११,५८७ शेतकरी मित्रांची निवड अपेक्षित आहे. ठाणे विभाग १,२४४, नाशिक विभाग १,४९४, पुणे विभाग १,७७९, कोल्हापूर विभाग १,२११, छत्रपती संभाजीनगर विभाग १,१२५, लातूर विभाग १,४६८, अमरावती विभाग १,७७२ आणि नागपूर विभाग १,४९४ असे विभागनिहाय लक्षांक निश्चित करण्यात आले आहेत.

शेतकरी मित्र ही संधी अनुभवी आणि उत्साही शेतकऱ्यांसाठी आहे. ज्यांना कृषि तंत्रज्ञान प्रसार आणि गाव पातळीवरील विकास कार्यात सक्रिय सहभाग घ्यायचा आहे, त्यांनी संबंधित सहायक कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. अधिकृत मार्गदर्शक सूचना आणि प्रपत्रे स्थानिक कृषि कार्यालयात उपलब्ध आहेत.







